कराड प्रतिनिधी | कोल्हापूर शहरातील मार्केट यार्ड ते लोणार वसाहत रोडवर एका तरुणाला अटक करून शाहूपुरी पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल साडेतीन किलो गांजासद़ृश अमली पदार्थ जप्त केला. सुमारे 63 हजार रुपये त्याची किंमत आहे.
कृष्णात दिलीप पवार (वय 28, रा. चिखली, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना 16 जानेवारी रोजी दुपारी 4 च्या सुमारास एक तरुण लोणार वसाहत रोडवर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पवार हा त्याठिकाणी संशयास्पदरीत्या आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडील काळ्या रंगाच्या बॅगेत गांजा आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून गांजा जप्त केला. पोलिस निरीक्षक डोके, सहायक फौजदार संदीप जाधव यांच्यासह इतरांनी ही कारवाई केली.