सातारा प्रतिनिधी । वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी करुन खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी, शिवीगाळ दमदाटीसारखे सातत्याने गुन्हे करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीवर काल दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्याने चार जणांच्या टोळीतील तिघांनी वाई पोलिस ठाण्यासमोरच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस निरीक्षक जितेंद्र राह्मणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तिघांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यामध्ये अक्षय गोरख माळी (वय २१), सारंग ज्ञानेश्वर माने (वय २४), वसंत ताराचंद घाडगे (क्य १९, सर्व रा. गुरेबाजार झोपडपट्टी वाई) यांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. भरणे यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांचेकडे सादर केलेला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी बी. वाय. भालचिम यांनी सदर प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर चौघाजणांविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चौघा जणांपैकी सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव, सारंग ज्ञानेश्वर माने, वसंत ताराचंद घाडगे हे तिघेजण वाई पोलीस ठाण्याबाहेर आले. त्यांनी पोलिसांना काही कळण्याअगोदर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
गुरेबाजार झोपड्पट्टीतील अक्षय माळी, सनी ऊर्फ राहुल सुरेश जाधव (वय २५), सारंग माने, वसंत घाडगे या चौघांवर गर्दीत मारामारी करून खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी करणे, शिवीगाळ, दमदाटी करणे अशी दखलपात्र, तसेच अदखलपात्र गंभीर गुन्हे दाखल होते. या टोळीतील चौघांना वेळोवेळी अटक, तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्यातील गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. वाई परिसरात ते सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्यावर कोणताच धाक न राहिल्याने वार्ड व परिसरातील लोकांना या टोळीचा उपद्रव होत होता.
दरम्यान, तडीपारीबाबतची सुनावणीत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनंतर या टोळीस जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीचा आदेश पारीत केला आहे. दरम्यान, तडीपार केलेल्या सारंग माने, अक्षय माळी व वसंत घाडगे या तिघांनी पोलिस ठाण्यासमोर आम्हाला तडीपार का केले? असे म्हणत अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.