सातारा प्रतिनिधी । आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आंतरजिल्हा सीमा तपासणी चौक्यांच्या ठिकाणी अनधिकृत अंमली पदार्थाची वाहतूक व अनेक गैरप्रकार घडू नये या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी आहे. या अनुषंगाने रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर या पाच जिल्ह्याच्या आंतरजिल्हा सीमापथक नाक्यावर वाहनांची अत्यंत कसून तपासणी केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारी झालेल्या या पाच जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
आगामी विधानसभा सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतच्या जिल्हा क्षेत्रातील रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसें, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणार्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणार्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकार्यांनी घेतला. निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी शेजारच्या राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकार्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली. ग्रामीण भागात तसेच सागरी मार्गाने होणाऱ्या वाहतुकीची प्रत्येक टप्प्यावर कसून तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले. सहभागी सर्व जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणूक आचार संहिता काळात केलेल्या उपाययोजना आणि विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्व तयारीची माहिती सादर केली. यावेळी सीमाभागातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.