पालच्या यात्रेत चोरटयांनी चार भाविकांचे दागिने केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस काळ पार पडला. मात्र, यात्रेत चोरीच्या घटना देखील घडल्या. चार भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून हातोहात तब्बल ३ लाखांचे दागिने गायब करण्यात आले. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात अनोळखी पाचजणांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील पाल यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता. या यात्रेला राज्यभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडोबा -म्हाळसा विवाह सोहळा पार पडत असताना भंडारा व खोबऱ्यांच्या तुकड्यांची उधळण केली जात होती. त्याचवेळी भाविकांच्या डोळ्यात भंडारा टाकून त्यांचे दागिने लुटले जात होते.

खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा झाल्यानंतर चार भाविकांचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. संगीता राजन कांबळे (वय ५०, रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र हिसकावून नेले. अमर रंगराव पाटील (वय ३५, रा. आसगाव, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावली. त्याचबरोबर आक्काताई शिवाजी भवर (रा. वेजेगाव, ता. खानापूर, जि. सांगली) यांच्याही गळ्यातील ६८ हजार रुपये किमतीची साेन्याची मण्याची माळ तर सतीश आनंदराव माेरे (रा. किणी, ता. हातकणंगल, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील २१ ग्रॅम ५०० मिली वजनाची सुमारे १ लाख १४ हजार ४८७ रुपयांची साेन्याची चेन हिसकावून नेली.

अशा प्रकारे एकूण ६ तोळ्यांचे सुमारे ३ लाख २ हजार ४८७ रुपयांचे दागिने हिसकावून नेण्यात आले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. ज्यांना तक्रार देणे शक्य होते. अशा भाविकांनी उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आणखी बऱ्याच लोकांचे दागिने चोरीस गेल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे हे अधिक
तपास करीत आहेत.