सोळशीत 100 वर्षांपूर्वीच्या मूर्ती; नायगावातून तांब्याची घंटा लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील मंदिरातून शंभर वर्षांपूर्वीची शुळपानेश्वर देवाची पंचधातूची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यावेळी नायगावच्या नागनाथ मंदिरातून तांब्याची घंटा चोरीला गेल्याचेही सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनाला आले. दरम्यान, ऐन श्रावण महिन्यात मंदिरात झालेल्या या चोऱ्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात झाली आहे.

सोळशीला आध्यात्मिक, ऐतिहासिक परंपरा आहे. येथे बऱ्याच पुरातन वास्तू, मंदिरे व शिलालेख आहेत. शुळपानेश्वर मंदिरातील भगवान शंकराच्या पुरातन मूर्तीला शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. ि हे मंदिर पांडवकालीन असल्याचे ग्रामस्थ सांगतात. दिनकरराव तुकाराम यादव यांनी ही मूर्ती पाच जुलै १९१७ रोजी दिल्याची नोंद आहे. ते १९०५ मध्ये ब्रिटिश सैन्यात भरती झाले. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धात अनेक भारतीय ब्रिटिश सैन्यात सहभागी झाले. दिनकरराव यांना जर्मनीच्या सीमेवर जावे लागले. बऱ्याच सैन्याला वीरगती प्राप्त झाली. काहींना जेरबंद करण्यात आले. दिनकरराव यांना वीरमरण आल्याची बातमी गावात धडकली. त्यांचे कपडे व बूटही आणण्यात आले. मात्र, युद्धात मारलेल्या सैनिकांमध्ये काही दिवस दिनकरराव पडून होते. ते युद्धकैदी म्हणून १९१४ ते १९१७ दरम्यान जर्मन सैन्याच्या ताब्यात होते. ‘सुटका झाल्यावर मे १९१७ मध्ये ते गावी आले.

गावातील सोळा शिवलिंगाच्या आशीर्वादानेच युद्धातून सुखरूप परत आल्याचा विश्वास त्यांना होता. त्यांच्या पत्नीने शुळपानेश्वराची पूजाअर्चा सुरू ठेवली होती. श्रद्धेपायी त्यांनी नाशिक येथून पंचधातूची तीन फूट उंच नागफणा असणारी मूर्ती आणून पाच जुलै १९१७ यादिवशी मंदिरात स्थापन केली. ही मूर्ती शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.

शूळपानेश्वर मंदिरातील पितळी मूर्ती व काळूबाई मंदिरातील धातूची घंटा तसेच नायगाव येथील नागनाथ मंदिरातील पितळी घंटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शूळपानेश्वर मंदिरातील दोन फूट उंचीची पितळेची मूर्ती व काळूबाई मंदिरातील पितळेची घंटा तसेच नायगाव येथील नागनाथ मंदिरातील पितळी घंटा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद सोळशीचे पुजारी बाळासाहेब बाबूराव साळुंखे यांनी वाठार पोलिसात दिली आहे. तपास पोलिस हवालदार साबळे करीत आहेत.