सातारा प्रतिनिधी | सातारा शहराजवळील खेड येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत भरदविसा कडी तोडून १० लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास करण्यात आला. यामध्ये सोन्याचे २९ तोळे दागिने, रोख रक्कमेचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. तर पोलिसांनी विविध पातळीवर चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी बापूराव बाबूराव सोनवलर (रा. खेड, सातारा. मूळ रा. भाडळी खुर्द, ता. फलटण) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार दि. १३ मार्च रोजी सकाळी साडे अकरा ते सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. तक्रारदार हे शिक्षक असून ते व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण बाहेर गेले होते.
यादरम्यान, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरुममधील लाकडी कपाटाच्या ड्रावरमधील सोन्याचे २९ तोळे आणि ६ ग्रॅम वजनाचे दागिने चोरले. तसेच यावेळी चोरट्यांच्या हाती रोख रक्कमही लागली. या चोरीनंतर संशियतांनी पलायन केले. सायंकाळी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
या घटनेत ९ लाख २९ हजार ५०० रुपयांचा एेवज चोरीस गेला असल्याचे तक्रारीत स्पष्ट केले आहे. तरीही आजच्या भावानुसार सोन्याचा दर अधिक आहे. त्यामुळे या चोरीत १० लाखांहून अधिक रक्कमेचा ऐवज लंपास झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.