गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधून 14 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा डबा केला लंपास

0
5
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा बसस्थानकातून प्रवाशांना चोरट्यांपासून सावधान राहण्याच्या वारंवार सूचना केल्या जात असून देखील सातारा बसस्थानक ते ठाणे दरम्यान प्रवासात प्रवाशाचे तब्बल १४ तोळे सोने चोरी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी सुनील नथुराम कदम (रा. रायघर, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील कदम हे ठाणे येथे राहण्यास आहेत. सोमवारी दुपारी ते कुटुंबीयांसमवेत मुंबईला निघाले होते. सातारा बसस्थानकात आल्यानंतर गर्दी होती. एसटीच्या दरवाजात प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधून दागिन्यांचा डबा हातोहात काढून घेतला.

कदम हे ठाण्यातील घरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग पाहिली असता दागिन्यांचा डबा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर त्यांनी ठाणे आणि सातारा पोलिसांशी संपर्क साधला. तब्बल १४ तोळ्यांचे दागिने चोरीस गेल्याने सातारा बसस्थानकात खळबळ उडाली. या घटनेची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.