सातारा प्रतिनिधी । वडूज – सातारा मार्गावर एका स्थानिक राजकीय महिला नेत्याचा बंद असलेला बंगला फोडून चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीच्या घटनेमुळे वडूज परिसरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडूज – सातारा रस्त्यावर मार्केट कमिटीसमोर शशिकला मुकुटराव जाधव (देशमुख) (वय 56, रा. वडूज) यांचा बंगला आहे. शशिकला देशमुख या चार दिवसांसाठी बाहेरगावी गेल्या होत्या. या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी जाधव यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजा व लोखंडी ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. घरातील 20 हजार रुपये किंमतीचा राणीहार, 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन तोळ्यांचे कॉईन, 60 हजार रुपये रोख, असा 3 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दहिवडीच्या उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पाहणी केल्यानंतर तपासाच्या सूचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक भिलारी हे या घटनेचा तपास करत आहेत.
चोर, भामट्यांचा सुळसुळाट
वडूज परिसरात मोबाईल चोर, पोलीस असल्याचे सांगून फसवणारे भामटे तसेच घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे चोरटे जोमात आणि पोलीस कोमात, असे एकंदर चित्र आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर एका पाठोपाठ एक चोरीच्या, फसवणुकीच्या घटना घडत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.