सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोवई नाका भाजी मंडई येथे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी एक घटना घडली. “मी पाटील, ओळखलं का आजी?, मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे,” असे सांगत वृद्धेच्या गळ्यातील सुमारे 50 हजार रुपये किंमतीची मोहनमाळ अज्ञात चोरट्याने लंपास केली. या घटनेनंतर चक्रावलेल्या आजींनी थेट पोलीस ठाणे गाठत चोरीची फिर्याद दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल गुरुवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वेणू अण्णासाहेब शिंदे (रा. गोडोली, सातारा) या वृद्ध आजी पोवई नाका भाजी मंडईच्याजवळ रस्त्यावर उभ्या होत्या. त्यावेळी त्याठिकाणी एक अज्ञात व्यक्ती आला. “मी पाटील, मला ओळखले का? मंडईत जाऊ नका तपासणी सुरू आहे,” असे त्याने वृद्धेला सांगितले.
त्या युवकांसोबत बोल्ट असताना त्याने पुन्हा आजींना “तुमच्या गळ्यातील मोहनमाळ काढून द्या माझ्याकडे. माझ्याकडे पिशवी असून त्यात ठेवतो,” असे म्हंटले. त्यानंतर आजींनी मोहनमाळ काढून त्या युवकाकडे दिली. त्यावेळी मोहनमाळ पिशवीत ठेवली पण त्या वृद्धेकडे दिलीच नाही. त्यानंतर संबंधित युवक हा दुचाकीवरुन त्या ठिकाणाहून पळून गेला. आपली मोहनमाळ पळवून नेल्याचे आजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दिली.