कुटुंब गेलं देवदर्शनाला अन् चोरट्यांनी बंद घरावर मारला डल्ला; तब्बल 50 तोळे दागिने केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आपल्याला सुखसमृद्धी लाभू दे, घरात भरभराटी होऊ दे अशी असे मागणे मागत संपूर्ण कुटूंब देवदर्शनासाठी तुळजापूरला गेलं अन पाठीमागे घरात विपरीत घडलं. बंद घर असल्याचे पाहात अज्ञात चोरटयांनी चोरी करत तब्बल 50 तोळे सोन्यावर डल्ला मारल्याची घटना फलटण तालुक्यातील जिंती येथे घडली आहे. या घटनेमुळे फलटण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

याबाबतची फिर्याद आदित्य रणवरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात दिली असून याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यातील जिंती गावातील कार्पोरेशन बंगला येथे राहणारे मेडिकल व्यावसायिक आदित्य अशोक रणवरे हे कुटुंबीयांसमवेत रविवारी सकाळी 11 वाजता तुळजापूरला देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहत अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतला. घराचे कुलूप तोडून त्यांनी घरात प्रवेश करून एका बेडरूममधील कपाटातील 35 तोळ्याचे व दुसऱ्या बेडरूम मधून 15 तोळे सोन्याचे दागिने असे एकूण 50 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

सोमवारी सकाळी 7.30 वाजता रणवरे कुटुंबीय तुळजापूरमध्ये असताना त्यांना नातेवाईकांनी घराचे कुलूप तोडल्याची माहिती दूरध्वनीवरून सांगितली. माघारी आल्यानंतर घरातील 50 तोळे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी फलटण ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी भेट देऊन सातारहून डॉग स्कॉड बोलावून घेतले होते. जिंतीतील भर वस्तीत झालेल्या घरफोडीने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक सागर आरगडे करत आहेत.