सातारा प्रतिनिधी । कुटुंब साखर झोपेत असताना चोरटयांनी गुपचूप घरात प्रवेश करून तब्बल १३ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे घरातील महिलेसमोर हा प्रकार घडला. नांदवळ, ता. कोरेगाव येथील एक घरातघडलेल्या चोरीच्या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नांदवळ येथील अमोल पवार, त्यांची पत्नी प्रियंका आणि वडील दत्तात्रय हे गुरुवारी (दि.9) रात्री झोपले असता, 1.45 च्या सुमारास चोरट्याने खिडकीतून प्रवेश केला. तो बेडरूममधील कपाटातून सोन्याचांदीचे दागिने चोरत असताना, दत्तात्रय पवार यांना उकाड्याने जाग आली. त्यांची पत्नी प्रियंका या बाथरूमला जाण्यासाठी उठल्या असता, दत्तात्रय पवार यांच्या बेडरूममधील कपाटातून चोरटा दागिने चोरून नेत असल्याचे दिसले.
प्रियंका यांनी आरडाओरडा केल्याने चोरटा पळून गेला. चोरट्याने जाताना दोन लाख 20 हजार रुपयांचे, साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे गंठण, दोन लाख 80 हजार रुपये किमतीच्या सात तोळ्यांच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 40 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे वेल आणि झुबे, एक हजार रुपयांचे चांदीचे पैंजण. आठ हजार रुपये किमतीचे लहान मुलाच्या गळ्यातील सोन्याचे बदाम आणि अंगठी, असा ऐवज चोरून नेला.
याबाबतची फिर्याद अमोल पवार यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दिली. कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेळके, वाठारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. चोराचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तपास करत आहेत.