उदयनराजेंच्या मिरवणूक रॅलीत चोरट्यांची ‘हात की सफाई’, 10 तोळे दागिन्यांवर मारला डल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी उदयनराजेंची जल्लोषात मिरवणूक काढली. मात्र, या मिरवणुकीत चोरट्यांनी हात सफाई करत उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांचे १० तोळ्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कार्यकर्त्यांना मिरवणूक पडली महागात

सातारा लोकसभा मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात मिरवणूक काढण्यात आली. मात्र, ही मिरवणूक उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना महागात पडली आहे. मिरवणूक रॅलीत हजारों समर्थक सहभागी झाले होते. गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या दहा तोळे दागिन्यावर डल्ला मारत साडे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यासंदर्भात अजून काही तक्रारी दाखल होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रॅलीतील गर्दीचा फायदा

रॅलीतील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दोघांच्या गळ्यातील आठ तोळ्याच्या चेन लंपास केल्या. अमर संजय जाधव (रा. तांगडे वस्ती, कोडोली, सातारा) हे देगाव फाटा चौकातील रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोन्याची चेन चोरट्यांनी लांबवली. दुसरी घटना पोवई नाक्यावर घडली आहे. नरेश सिताराम अग्रवाल (रा. कराड) यांच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाची सोन्याची चेन चोरट्यांनी लंपास केली.

पोलीसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

या दोन्ही घटनांची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, अशाच प्रकारच्या चोरीच्या आणखी दोन-चार घटना घडल्या आहेत. मात्र, याबाबत अद्यापही तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. या घटनांची दखल घेऊन सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक रॅलीच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. यापूर्वी साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीतही चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता.