सातारा प्रतिनिधी | वाई तालुक्याच्या पश्चिम भागासाठी वरदान ठरलेल्या ‘जललक्ष्मी’ योजनेचे एकूण ३२ व्हॉल्व्ह चोरट्यांकडून लंपास करण्यात आले. याप्रकरणी धोम पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता विक्रम मोकाशी यांनी वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जललक्ष्मी योजना बलकवडी धरणावर उभारण्यात आली आहे. या धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे धोम जलाशयाच्या डाव्या व उजव्या तीरांवरील शेतजमिनीला पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. २०१६ मध्ये या योजनेचे बहुतांशी काम पूर्ण होऊन २७ गावांमधील ८५७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. मात्र, या योजनेतील वितरणव्यवस्थेचे काम प्रलंबित असून, देखभाल-दुरुस्तीअभावी जलवाहिनीला सातत्याने गळती लागते. त्यामुळे ही योजना कायमच चर्चेचा विषय ठरते.
या योजनेतून नुकतेच शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. आवर्तन सुरू झाल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता विक्रम मोकाशी पाहणी करण्यासाठी पश्चिम भागात गेले असता त्यांना कुसगाव, न्हाळेबाडी व पसरणी गावांच्या हद्दीतील जलवाहिनीचे ३२ व्हॉल्व्ह चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याची किमंत सुमारे ५४ हजार रुपये असून, वजन १ हजार ३५० किलो इतके आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक बिराजदार तपास करीत आहेत.