वेण्णा नदीपात्रात धूत होता म्हैस, पाठीमागून आलेल्या चोरानी गळ्याला लावलं ब्लेड; पुढं घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी वेण्णा नदीपात्रात म्हैस धुवत असलेल्या तरुणाच्या गळ्याला पाठीमागून आलेल्या चोरटयानी ब्लेड लावून लुटले. मात्र, प्रसंगावधान राखून संबंधित तरुणाने नागरिकांच्या मदतीने चोरट्याला पकडून बेदम चोप दिला. मंगळवारी (दि. २७) रोजी हि घटना घडली असून जखमी चोरट्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेक्या माहितीनुसार, विशाल बाळू काळे (वय २५, रा. काेयना सोसायटी, लक्ष्मी टेकडी कॅनाॅलजवळ खेड, ता. सातारा) हा तरुण मंगळवारी दुपारी वाढे फाट्यावरील वेण्णा नदीमध्ये म्हैस घेऊन धुण्यासाठी गेला होता. तो म्हैस धूत असताना संतोष भरत यादव (वय २२, रा. रहिमतपूर, ता. काेरेगाव, जि. सातारा) हा पाठीमागून आला. त्याने विशालच्या गळ्याला ब्लेड लावले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील ५ तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. या झटापटीत विशालच्या गळ्याला चेन काचून व चोरट्याच्या हातातील ब्लेड लागून तो जखमी झाला.

जखमी झालेल्या विशालने प्रसंगावधान राखून संशयित चोरटा संतोष यादवला पकडून ठेवले. त्याने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले. त्यानंतर त्या लोकांनी संशयित चोरटा संतोष यादवची चांगलीच धुलाई केली. या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चोरटा संतोष आणि फिर्यादी विशाल याला पोलिसांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. सातारा तालुका पोलिस ठाण्यात संतोष यादववर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे अधिक तपास करीत आहेत.