सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात सध्या चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरे बुद्रुक येथील मधुकर कापसे यांच्या घराचे कुलूप तोडून रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरातील 6 तोळे सोने व 15 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील पिंपरे बुद्रुक हद्दीतील कापसेवस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मधुकर कापसे हे आपल्या कुटूंबियांसह राहत आहेत. मंगळवारी रात्री ते त्यांच्या घरात झोपले असताना अज्ञात चोरटयांनी त्याच्या घरात दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी घरातील ६ तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे १५ हजाराची रोकड रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी लंपास केली.
रात्री बाजूच्या खोलीत घरातील सर्वजण झोपलेले असताना चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरील बाजूने कड्या लावून चोरी केली. ही चोरी रात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यान झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. आज सकाळी लोणंद पोलीसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.