सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरात दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. दोन ठिकाणी करण्यात आलेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
संगमनगर येथील घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व इतर साहित्य असा सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत बेगम नजीर शेख (रा. संगमनगर) यांनी फिर्याद दिली आहे. २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी घराचे सेफ्टी लॉक तसेच लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील बल्ब, लॉक व रोख रक्कम असा १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार गोसावी तपास करत आहेत.
तर दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेली घरफोडीची घटना ही तामजाईनगर परिसरात घडली असून याबाबत परवीन सिकंदर भालदार (रा. आदर्श कॉलनी, तामजाईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमधील गोदरेज कपाटातून त्यांनी आठ जोडे चांदीचे वाळे, दहा जोड पैंजण, आठ बिंदी, गणपतीची फ्रेम, अर्धा तोळे सोन्याचे वेढणे, आठ ग्रॅम सोन्याच्या आठ अंगठ्या, सोन्याच्या तारा, चांदीची अत्तरदाणी व उदबत्ती स्टॅण्ड असा सुमारे ६३ हजार रुपयांचा ऐवज लपांस केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार मोहरे तपास करत आहेत.