कराडात चोरट्यांनी फोडले प्रसार माध्यमांचे कार्यालय; तब्बल इतकी रक्कम केली लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांकडून घडफोडीचे प्रकार केले जात आहेत. आता चोरट्यांनी काही कार्यालयांकडे आपला मोर्चा वळवला असून त्यांनी कराड शहरातील एका प्रसार माध्यमाचे कार्यालय फोडून सुमारे 50 हजाराचे साहित्य तसेच रोकड लंपास केल्याची घटना शनिवार पेठेत पंचायत समितीनजीक रविवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत प्रकाश काशिनाथ पिसाळ (रा.कार्वे, ता. कराड) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील कार्वे येथील राहणारे प्रकाश पिसाळ यांचे शनिवार पेठेत पंचायत समितीनजीक कार्यालय आहे. शुक्रवारी दिवसभराचे काम आटोपल्यानंतर रात्री सात वाजण्याच्या सुमारास प्रकाश पिसाळ यांनी त्यांचे कार्यालय बंद केले.शनिवारी ते कार्यालयाकडे आले नाहीत.तर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयानजीक असलेल्या हॉटेल चालकाने त्यांना फोन करून चोरी झाल्याचे सांगितले.

त्यामुळे प्रकाश पिसाळ हे तातडीने कार्यालयाकडे आले.त्यावेळी कार्यालयाच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केल्याचे दिसून आले. तसेच कार्यालयात कपाटामध्ये ठेवलेली १७ हजार रुपयांची रोकड,३० हजार रुपये किमतीचे कॅमेरे,दोन हजार रुपये किमतीच्या ट्रॉफी आणि एक हजार रुपयाची संगणकाची हार्ड डिस्क चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.तसेच संबंधित कार्यालयानजीक असलेल्या विश्वास परशराम शिंदे यांच्या घराची काच फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुनील पन्हाळे तपास करीत आहेत.

पोलिस ठाणे परिसरातच 3 ठिकाणी चोरट्यांकडून डल्ला

कराड शहरातील पोलिस उपअधीक्षक कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलिस निरीक्षक यांचे निवासस्थानलगत अंतरावर असणाऱ्या पंचायत समिती परिसरातील स्वराज्य हॉटेल, स्वप्ननगरी कार्यालय आणि याच परिसरातील शिंदे यांच्या घरात चोरी झाली आहे. शिंदे यांच्या घरातून पिस्टल चोरीस गेले आहे. तर स्वप्ननगरी कार्यालयाच्या काचा फोडून रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. तर अन्य एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे.