कराड प्रतिनिधी | पतीचा आजार बरा करण्यासाठी मंदिरात पूजा करण्याचा बहाणा करून चोरट्याने वृद्ध महिलेचे सव्वा लाख रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. कोयना वसाहत, ता. कराड येथील विठ्ठल मंदिरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत अक्काताई ज्ञानदेव काळुगडे (वय ६५, रा. सोहम अपार्टमेंट, शिंदेनगर, कोयना वसाहत-मलकापूर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत येथील शिंदेनगरमध्ये राहणाऱ्या अक्काताई काळुगडे या मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी चालत निघाल्या होत्या. त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. संबंधिताने अक्काताई यांना आज्जी तुम्ही वाकून का चालत आहात, अशी विचारणा केली. त्यावेळी आक्काताई यांनी मणका दुखत असल्याचे सांगितले. संबंधिताने मी मणक्याचा आजार बरा करतो, असे सांगितले असता अक्काताई यांनी त्यांच्या पतीला अर्धांगवायू झाल्याचे सांगून ते आजारी असल्याचे सांगितले.
त्याचवेळी तुमच्या पतीचा आजार मी लगेच बरा करतो. आठ दिवसात ते चालायला लागतील. आपण तुमच्या घरी जाऊया, असे म्हणत संबंधित व्यक्ती अक्काताई यांच्यासोबत त्यांच्या घरी गेली. घरात गेल्यावर त्याने तांदूळ, साखर, हळद, कुंकू, धने आदी साहित्याचा उतारा तयार करून त्यावर सोन्याचा दागिना ठेवण्यास सांगितले. त्यानुसार अक्काताई यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र त्या साहित्यावर ठेवले.
संबंधिताने ते सर्व साहित्य एका हिरव्या कापडात बांधले. त्यानंतर त्या कापडाचे गाठोडे घेऊन तो अक्काताई यांच्यासोबत घराजवळच्याच विठ्ठल मंदिरात गेला. त्याठिकाणी पूजा करण्याचा बहाणा करीत त्याने अक्काताई यांना तांब्यातील पाणी तुळशीला घालण्यास सांगितले. तसेच कापडात बांधलेल्या साहित्याचे गाठोडे त्यांच्याकडे देऊन ते गाठोडे घेऊन तुम्ही घरी जा, जाताना कुणाशी बोलू नका, पाठीमागे वळून पाहू नका असे बजावले. त्यामुळे अक्काताई कुणाशी काहीही न बोलता घरी निघून आल्या.
घरात पोहोचल्यानंतर त्यांनी गाठोडे सोडले असता त्यामध्ये त्यामधील सव्वा लाख रुपये किमतीचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र संबंधिताने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अक्काताई काळुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.