जिल्ह्यात गुलाबी थंडी अन् दाट धुक्यांनी हरवल्या वाटा, दवबिंदूंनी शेतशिवारे झाली चिंब!

0
1

कराड प्रतिनिधी । सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत असून गुलाबी थंडीमुळे सकाळचे वातावरण मनमोहक बनत आहे. दरम्यान, आज शनिवारी पहाटेच्या वेळी जिल्ह्यासह कराड, पाटण तालुक्यात दाट धुक्यानी महामार्गावरील व अंतर्गत रस्त्यावरील वाटा हरवून गेल्या. दाट धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते. धुक्यामुळे समारील दृश्ये स्पष्ट दिसत नसल्याने वाहनधारकांना आपली वाहने दिवे लावून चलवावी लागली.

महाबळेश्वर, पाचगणी, कोयना, यवतेश्वर, कास या पर्यटनस्थळांवर देखील शनिवारी दाट धुक्याची दुलई पसरली. पाण्यावरील वाफा आणि धुक्यात कराडच्या कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम लुप्त झाला तर ‘वाट एक जुनी, हरवली दाट धुक्यात लपलेले दवबिंदू कुठे चमकतात पानात’, या कवितेसारखे आल्हाददायक चित्र शनिवारी सर्वत्र पाहायला मिळाले. दाट धुक्यामुळे सकाळी आठपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते.

सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी पडलेल्या धुक्याने उत्तर भारतातील धुक्याचा फील आला. यावेळी वाटा धुक्यात हरवून गेल्या तर शेतशिवारे दवबिंदूंनी ओली चिंब झाली. सकाळी शाळेला जाणारी मुले बोचर्‍या थंडीने कुडकडत होती. पुणे-बंगळुरू महामार्गावर देखील प्रचंड धुके पसरले होते.

दाट धुक्याचा आणि निसर्गाचा प्रत्येकानं आनंद घ्यावा

गेली अनेक वर्षे झाली आम्ही सकाळच्यावेळी मॉर्निंग वोकला जात आहोत. आज शनिवारी पडलेल्या दाट धुक्यांमुळे निसर्गातील सौंदर्य पहायला मिळाले. दाट धुके पडल्याने त्याचा आनंद घेतला. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल होऊन रात्री कडाक्याचीथंडी पडत असून सकाळच्यावेळी धुक्याची झालर पहायला मिळत आहे. याचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया कराड तालुक्यातील बनवडी येथील सेवानिवृत्त प्राचार्य गुणवंत साठे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

पहाटे धुक्याची चादर

कराडसह बनवडी, सैदापूर शहर परिसरात शनिवारी पहाटे धुक्याची चादर पसरली हाेती. पहाटे पाच वाजेपासून धुके दाटले ते सकाळी आठ वाजेपर्यंत कायम हाेते. दाट धुक्यामुळे पुढील व्यक्ती दिसणेही अवघड झाले. त्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत वाहनांना प्रखर दिवे लावण्याची वेळ आली हाेती. सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील वाहनधारकांना धुक्यामुळे वाहनाचे दिवे सुरू ठेवूनच वाहने चालवावी लागली. पहाटेच्या वेळेस पडलेल्या धुक्याचे क्षण अनेकांनी आपल्या घराच्या खिडकी, गॅलरी, गच्चीवरून माेबाइलमध्ये टिपले.