अगोदर ऊसावरून आता मोबाईल स्टेट्सवरून शशिकांत शिंदे अन् महेश शिंदेंच्यात तू-तू, मैं-मैं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं पाहायला मिळत आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सर्व ठिकाणी सुरू असून महायुतीचे उमेदवार महेश शिंदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे प्रचारात व्यस्त आहेत. मात्र, अलीकडच्या काळात दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी ऊस पेटवल्याच्या कारणांवरून दोन्ही शिंदेंच्यात चांगलीच आता त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार महेश शिंदे यांच्याबाबत एका युवकाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियाच्या स्टेटसवर ठेवल्याच्या कारणावरून संबंधित युवकावर महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये बोलवून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन शशिकांत शिंदे यांनी ठिय्या आंदोलन केले.

कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या कारणावरून शशिकांत शिंदे यांनी संबंधित पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. तसेच पोलीस अधिकाऱ्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे आणि कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे पुसेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जबरदस्तीने या ठिकाणी लोकांना धाक दाखवून पक्षांतर करण्याचा प्रयत्न : शशिकांत शिंदे

”गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कोरेगाव मतदारसंघांमध्ये पोलीस यंत्रणेचा वापर करून जबरदस्तीने या ठिकाणी लोकांना धाक दाखवून पक्षांतर करण्याचा प्रयत्न होतोय. याचा निषेध करण्यात आलेला आहे.आचारसंहिता असताना पोलिसांनी पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याची भूमिका बजावू नये असं आमचं सांगणं असताना सुद्धा सातत्याने त्याच पद्धतीची कारवाई करण्यात येत आहे. निवडणूक ही लोकशाही ने होऊ दे. विरोधकांची निवडणूक त्यांच्या हातातून गेली असल्यामुळे ते अशा गोष्टीचा वापर करत आहे. पोलिसांच्या माध्यमातून गेले दोन-तीन महिन्यापासून कार्यकर्त्यांना पक्षांतर करायला लावत आहे. याची यादी माझ्याकडे आहे. अशा पद्धतीने पोलिसांकडून दहशत होत असेल, तर त्याचा मी निषेध करतो”, असे शशिकांत शशिकांत शिंदे यांनी म्हटले.

ऊस पेटवण्यामागे माजी आमदारांचे कट कारस्थान : महेश शिंदे

”शशिकांत शिंदे यांना कामच काही उरलेलं नाही. आम्ही केलेली विकासकामे आणि लोक आमच्यासोबत येत आहेत, त्यामुळे त्यांचे डोके फिरले आहे. मागे काही दिवसांपूर्वी देखील ऊस पेटवला म्हणून आमच्यावर आरोप केला, हा सर्व स्टंट आहे. संबंधित युवकाने घाणेरडा स्टेटस ठेवला होता का? याच्या मुळात जावा…त्यांनी काहीच केले नाही का? मग यांच्या मुलाने केले का? मागील काही दिवसांपूर्वी देखील ऊस जो पेटवला यामध्ये देखील माजी आमदारांचा सहभाग आहे. त्यांनीच हे कट कारस्थान केले. त्यांची सोशल मीडियाची टीम यामध्ये सहभागी” असल्याचा आरोप यावेळी महेश शिंदे यांनी केला आहे.