कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी; आज पुन्हा वाहतूक कोंडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचा फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. आज पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली. या गर्दीने आज वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.

कास पठार फुलोत्सव ऐन बहरात असल्याने मागील काही दिवसांपासून कास पठार पर्यटकांच्या गर्दीने भरभरून वाहत आहे. कासवर मोठ्या प्रमाणात फुलांचे गालिचे झाले असून अजून काही दिवसच हा फुलोस्तव पर्यटकांना पाहता येणार आहे. शनिवार रविवार या सुट्ट्यांच्या दिवस असल्याने मोठी गर्दी होती. आज दुपारनंतर आलेल्या पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला. ऑनलाईन बुकींग करून साधारणपणे पाच हजार लोक येतात तर थेट येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच हजारांच्यावर होती.

दहा हजारांहून अधिक पर्यटक एकाच दिवशी आल्याने नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली. समितीने ऑफलाईन आलेल्या पर्यटकांचे बुकिंग दुपारनंतर बंद केल्याने वाहनतळावर वाहनांसाठी जागाच उपलब्ध नसल्याने पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या केल्या. त्यामुळे पर्यटकांना चालत जाणे ही दुरापास्त झाले. आज रविवार असल्याने सातारा शहरापासूनच येवतेश्वर घाट आणि कास पठारपर्यंत 22 किमी अंतरापर्यंत रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून नेहमी प्रमाणे वाहतूक कोंडी झाली.