कास पठार ते कास धरण रस्त्यावर पाणीच पाणी; वाहनधारकांची कसरत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा शहरात पावसाची संततधार सुरु असून शहरालगत असलेल्या बामणोली परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे स्थानिकांसह पर्यटकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. अशात कास पठार ते कास धरण रस्ता मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला असल्याने त्यासाठी सातारा नगरपालिकेने तयार केलेला नवीन कच्चा पर्यायी रस्ताही पाणी साचून खचला आहे. या ठिकाणाहून ये-जा करणारी वाहने अडकत आहेत.

कास पठार ते कास धरण रस्त्यावर पाणी साचत असल्याने त्यामध्ये अडकलेली वाहने काढण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमधून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कास बामणोली परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्ठीमुळे कास व बामणोली परिसरामध्ये रस्त्यालगत दरडी कोसळत आहे. साईट पट्टया खचल्या असून कास बामणोली रस्त्याला काही ठिकाणी रस्त्यामध्ये झाडे पडलेली आहेत.

कास धरणाची उंची वाढवल्यामुळे कास पठार ते कास धरण रस्ता पाण्याखाली गेला आहे. स्थानिक व पर्यटकांच्या गाड्यांसाठी सातारा नगरपालिकेने कास पठार रस्ता (बंगला) ते कास धरण असा पर्यायी नवीन कच्चा रस्ता तयार केला आहे. परंतु, सातारा नगरपालिकेने केलेला नवीन रस्ता खचला आहे. त्यातच रस्त्यामध्ये टाकलेली गटाराची पाइप छोटी असल्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी सरळ डांबर रस्त्यावर येत आहे. यामुळे डांबरी रस्त्याच्या सुरूवातीला पाणी साचून रस्ता खचला असल्यामुळे स्थानिकांच्या व पर्यटकांची वाहने खचलेल्या रस्त्यामध्ये अडकली. यावेळी प्रसंगावधान दाखवून कास पठार समितीच्या कर्मच्यार्‍यांच्या व स्थानिकांच्या मदतीने अडकलेली वाहने काढण्यात आली. मात्र, भर पावसात सर्वांनाच कसरत करावी लागली.