सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई; 786 गावांना 177 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ७८६ गावांना १७७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या चार तालुक्यांत प्रामुख्याने टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा एकूण १२ लाख २९ हजार ५८५ जनावरांपैकी ७० टक्के जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी चारा डेपो, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मात्र, चारा डेपो आणि छावण्यात पाठीमागे झालेल्या गैरव्यवहाराचा विचार करून चारा छावण्या सुरू करण्याऐवजी पशुसंवर्धन विभागाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरच चाऱ्यासाठी पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही सुरू असल्याने त्यात गैरप्रकाराला आळा बसणार आहे.

ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात सुमारे तीन कोटी २९ लाख जनावरे असून, जिल्ह्यात एकूण १२ लाख २९ हजार ५८५ जनावरे आहेत. त्यांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि राजकीय नेत्यांकडून केली जात आहे.

मात्र, मागील चारा छावण्या आणि चारा डेपोत झालेल्या गैरप्रकारांची दखल सरकारने घेतली आहे. उन्हाळा लागताच टॅंकर लॉबी, चारा पुरवठादार लॉबीदेखील सक्रिय होते. शासनाकडून चारा वितरणातील गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘डीबीटी’द्वारे पशुपालकाला चारा खरेदीसाठी थेट त्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

१२ लाख २९ हजार ५८५ जनावरांची संख्या

शेतीपूरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी जनावरांचे पालन करतात. जिल्ह्यात गाय, म्हैस, शेळी, मेंढी मिळून १२ लाख २९ हजार ५८५ जनावरांची संख्या आहे. अपुऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. टंचाईमुळे दुग्ध व्यवसायही चाऱ्या अभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे.