सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यातील खटाव तालुक्यासह कातरखटाव परिसरातील शिवारात ज्वारी काढणीला वेग आला आहे. मात्र, या ठिकाणी मजुराच्या तुटवड्याने शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आल्याचे दिसून येत आहे. सध्या मजूर मिळत नसल्याने पैरा करून रानावनात ज्वारी काढणीची कामे केली जात आहेत.
गेली दोन वर्षे झाली अत्यल्प तर काही भागात पावसाने हुलकावणी देत कमी हजेरी लावल्याने मागास पेर झाली होती. खटाव तालुक्यासह या भागात भूगर्भात पाणीच नसल्याने व विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठल्याने ज्वारीला शेवटचे पाणीच मिळाले नाही. त्यामुळे ज्वारीची कणीस पोटाऱ्यात अवळले गेल्याने चाळीस टक्के उत्पादनात घट पडली आहे. अशा तऱ्हेने चिंतेत पडलेल्या शेतकऱ्यांच्या हाती ज्या ठिकाणी वीस पोती धान्य होणार तिथे दहा ते बारा पोती पदरात पाडून घ्यावी लागणार आहेत.
सध्याला त बाजारपेठेत तीन ते चार हजार प्रतिक्विंटल दर चालू असून, येत्या पुढील काही दिवसांत पाच ते सहा व हजार रुपये मोजावे लागणार, अशी चिन्हे दिसून येत आहेत. चार महिन्यांचा कालावधी लागणाऱ्या या पिकाला चार ते पाच वेळा पाणी द्यावी लागतात; परंतु नेहमी या पाचवीला पूजलेल्या या दुष्काळी या भागात खरीप आणि रब्बी हंगामात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. शिवारात ज्वारीपेक्षाही गव्हाच्या पिकाला पाणी जास्त लागत असते. सध्या विहिरींनी तळ गाठला असून कूपनलिकेलेची पाण्याची पातळी खालावल्यामुळे शिवारात गहू, हरभर या पिकांच्या उत्पादनात कमालीच घट झाल्याचे दिसत आहे.