सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. मात्र, त्या ठिकाणांपैकी एक आश्चर्यकारक ठिकाण हे सातारा तालुक्यातील लिंबच्या शेरी येथे आहे. सातारा तालुक्यातील लिंब येथे एक पुरातन विहीर असून ती तब्बल 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद आहे. या विहिरीला 12 मोटीची विहीर म्हणूनच ओळखले जाते. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक राजवाडा असून छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आल्याचे अनेक संदर्भ आढळतात.
सातारा तालुक्यातील लिंबच्या शेरी येथे ऐतिहासिक 12 मोटेची विहीर आहे. ही विहीर म्हणजे शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना मानला जातो. या विहिरीत प्रशस्त महाल आहे. सन 1641 ते 1645 दरम्यान ही विहीर बांधल्याचे सांगितले जाते. लिंब येथील विहिरीला 12 मोटेची विहीर म्हणून ओळखले जात असले तरी विहिरीला 15 मोटी आहेत. परंतु, यातील 12 मोटी वापरात असल्याने 12 मोटेची विहीर म्हणूनच ओळखले जाते.
विहिरीत एक शिलालेख असून त्यावर माहिती आहे. विशेष म्हणजे या विहिरीचे पाणी कितीही दुष्काळ पडला तरी कमी होत नाही. लिंब येथील विहीर दोन टप्प्यात आहे. पहिला टप्पा जात असताना 28 पायऱ्या उतराव्या लागतात. 28 पायऱ्या उतरल्यानंतर विहिरीच्या पहिल्या टप्प्याला उपविहीर किंवा आड असे देखील म्हणतात. आपण ‘इकडे आड तिकडे विहीर’ ही म्हण ऐकली असेल. या विहिरीकडे पाहून या म्हणीची प्रचिती येते. या विहिरीचा पहिला टप्पा म्हणजे आड आणि दुसरा टप्पा म्हणजे विहिरीचा मुख्य भाग आहे.
आडाच्या पहिल्या टप्प्यात 6 मोटी
पूर्वीच्या काळात सहा मोटीमधील 3 मोटी चालू होत्या. दोन पूर्व बाजूच्या आणि एक पश्चिम बाजूची आहे. आडाची खोली 35 फूट असून उत्तर बाजूला दोन शिल्प आहेत. त्या शिल्पाला व्याल असे म्हणतात. असेच हुबेहूब शिल्प रायगडावर देखील आहे. शरीर सिंहाचे आणि तोंड वाघाचे असल्याने साहित्यात मांडणी करताना हे शिल्प शौर्याचे प्रतीक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मुख्य विहिरीला 9 मोटी आहेत आणि आडाला 6 मोटी आहेत. एकूण 15 मोटीची विहीर आहे, मात्र पूर्वीच्या काळात 12 मोटी सुरू असल्याने या विहिरीला 12 मोटीची विहीर म्हटले जाते. या विहिरीचे पाणी बैलाच्या साह्याने काढण्यात येत असे. शिवकालीन स्थापत्य शास्त्राचं एक अदभुत उदाहरण म्हणजे ही शेरी लिंब गावची बारा मोटेची विहीर आहे.
विहिरीच्या मध्यभागी दोन मजली राजवाडा
या विहिरीच्या मध्यभागी दोन मजली राजवाडा आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी आणि आड असल्याने ही अत्यंत सुंदर वास्तू नेमकी कशा पद्धतीने बांधली असेल याचे कोडे अजून देखील सुटले नाही. या विहिरीला वरून पाहिल्यास साधारणता शिवलिंगाच्या आकाराची विहीर दिसते. त्याच बरोबर या विहिरीला पुढच्या बाजूने पाहिल्यास अष्टकोनी आकाराची विहीर दिसते. विहिरीच्या आतील बाजूस चार शिल्पे आहेत. त्या शिल्पाला शरब असे म्हटले जाते. शरब प्राणी हा अतिशय रागीट प्राणी म्हणून ओळखला जातो.
आलिशान असा राजवाडा
मुख्य विहिरीच्या वरच्या बाजूस एक जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा देखील आहेत. विहीर दोन टप्प्यात विभागली आहे. अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती असणारा आड आहे . या दोन्ही विहिरींच्या मध्ये आलिशान असा राजवाडा आहे. या राजवाडाच्या मध्यभागी चार खांब आहेत. प्रत्येक खांबावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र आहे. दुसऱ्या खांबाला हत्ती, घोडे, श्रीकृष्ण राधा, तर एका बाजूला प्रभू राम, लक्ष्मण, सीता आणि महाराजांचे शिल्प कोरलेले आहे. त्यावरील बाजूस कोरीव फुलांचे नक्षीकाम केलेले आहे.