नवरात्रोत्सवात नारळाने खाल्लाय भाव; कराडच्या बाजारपेठेत शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सध्या नवरात्रोत्सव असल्याने उपवासाचे पदार्थ, फळे यांची जोमाने विक्री होऊ लागली आहे. अशा सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीसच नारळाने देखील चांगलाच भाव खाल्ला. नारळाच्या दरात शेकड्यामागे तब्बल 600 रुपयांची वाढ झालयाचे पहायला मिळले. या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्य ग्राहकांना देखील चांगलाच सहन करावा लागत आहे. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या 1600 ते 1700 रुपये शेकड्याच्या दराने नारळाची विक्री होत आहे.

सध्या किरकोळ बाजारात एका नारळासाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नारळ विक्रेत्याकडे आठवड्याला तब्बल तीन ते साडे तीन लाख नारळाची आवक होते. अजून काही दिवस दर कायम राहतील असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच तालुक्याच्या होलसेल नारळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे तामिळनाडू, कर्नाटक राज्यांतून नारळांची आवक होते. कराड बाजार समितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नारळ हे विक्रीसाठी येतात. याठिकाणी एकूण 7 होलसेल नारळ विक्री करणारे व्यापारी असून त्यांच्याकडून आठवडाभरात तीन ते चार लाख नारळाची खरेदी तामिळनाडू, कर्नाटक येथून केली जाते.

यंदा पावसामुळे नारळ उतरविण्याचे काम ठप्प आहे. उत्पादन कमी व वाढलेली मागणी हे दरवाढीचे प्राथमिक कारण असल्याचे व्यापाऱ्यांमधून सांगितले जात आहे. गणेशोत्सवात दर स्थिर होते. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच शेकड्यामागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. सध्या हि दरवाढ नियंत्रणात आली असून नारळाचा शेकड्याचा भाव हा १६०० ते १७०० रुपये इतका आहे.

काही दिवस नारळाच्या किमतीत वाढ कायम राहील

पावसाचा मोठा फटका हा नारळ उत्पादकांना बसला आहे. तसेच तामिळनाडू, कर्नाटक राज्यांतून येणारी नारळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दरवाढ झालेली आहे. दिवाळीपर्यंत शेकड्यामागे कमी- जास्त दरवाढ होईल, अशी माहिती कराड कृषी उत्पन्न बाजार समितीतील ओम ट्रेडिंग कंपनीचे नारळ व्यावसायिक नितीन सुरेश शेटे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

कराड बाजार समितीमधून लाखो नारळांची खरेदी विक्री

कराड, चिपळूण, पाटण, खटाव, ढेबेवाडी, कराड उत्तर आदी तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला भाजीपाला आणि इतर शेत माल विक्रीसाठी येतात. या ठिकाणी गुळाबरोबरच नारळाची देखील मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. आठवडाभरात येथील होलसेल नारळ व्यापारी मंडळींकडून तीन ते चार लाख इतके नारळांची विक्री केली जाते.