विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’; नेत्यांवर मनधरणीची वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचारसभा, रॅली, पदयात्रा, बैठकांचा धडाका सुरू आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस उरले असून राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांसाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्था करून मेजवानी द्यावी लागत आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत प्रचंड चुरशीने प्रचार यंत्रणा राबवली जाऊ लागली आहे. येथून पुढे राहिलेल्या दिवसांमध्ये कार्यकर्त्यांची फोडाफोडी आणि पडद्यामागच्या हालचाली वाढत जाणार आहेत. त्याचबरोबर वजिराच्या भूमिकेत असलेल्या नेत्यांकडून डाव- प्रतिडाव आखण्यास सुरुवात झाली आहे.

सातारा जिल्ह्यात भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, अपक्ष यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सतरा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी, अपक्ष उमेदवार यांचा प्रचार सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. जाहीर प्रचाराची सांगता दि. १८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

आता उमेदवारांसाठी जाहीर प्रचार करण्यासाठी केवळ सहा दिवसच हातात राहिले आहेत. निवडणुकीची तारीख एका-एका दिवसाने जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रचार यंत्रणा अधिक गतिमान केली जात आहे. निवडून येण्याची खात्री असलेल्या पहिल्या तीन उमेदवारांकडून तर ही यंत्रणा अधिकच प्रभावी करण्यात आली आहे.

डाव-प्रतिडाव फोडाफोडी व पडद्यामागील हालचालींना वेग

एकीकडे प्रचार यंत्रणा राबवताना विरोधी उमेदवारांवर टीकास्त्र सोडण्याबरोबरच आपण आगामी पाच वर्षांत कोणती कामे करणार, याचा लेखाजोखा प्रत्येकजण मांडत आहे. दुसरीकडे उमेदवारांचे राजकारणातील वजीर म्हणून सक्रिय असलेले दुसऱ्या फळीतील नेते जोडण्या लावण्यात व्यस्त झाले आहेत. विरोधी उमेदवाराच्या कोणत्या गटामध्ये नाराजी आहे? दोन्ही दगडांवर हात ठेवून असलेले अजून कोणते गट आहेत? त्याचबरोबर अजूनही भूमिका गुलदस्त्यात ठेवलेले कोणते स्थानिक नेते आहेत? याची खडा न खडा माहिती त्यांच्याकडून गोळा केली जात आहे.

घराघरात पत्रके वाटप

घराघरात पत्रके वाटण्यासाठी, प्रचार फेरीत झेंडे व उमेदवारांचे फोटे असलेले फलक फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू आहे. उमेदवारांना यासाठी कसरत करावी लागत आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना टोप्यांचे वाटप केले जात आहे.