कराड प्रतिनिधी | कराड येथील मुख्य टपाल कार्यालय नजीक जीपची तोडफोड करून युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. सोमवार दि. ८ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम शहाजी बाकले (वय २६, रा. जुळेवाडी, ता. कराड) याने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सुरेश मंडले, अशोक मंडले, सौरभ वायदंडे, प्रमोद कोळेकर. सागर मंडले, फिरोज मुल्ला, सरफराज मुल्ला (सर्वजण रा. कार्वे) यांच्यासह अन्य पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुळेवाडी येथील शुभम बाकले याच्यासह इतर युवक सोमवारी दुपारी न्यायालयात आले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण नाश्ता करण्यासाठी तेथून बाहेर पडले. चर्चनजीक असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची जीप पार्क केली होती.
पार्किंगमधून जीप घेऊन हे त सर्वजण बाहेर येत असताना सुरेश मंडले, अशोक मंडले, सौरभ वायदंडे, प्रमोद कोळेकर, सागर मंडले, फिरोज मुल्ला, सरफराज मुल्ला यांच्यासह अन्य चार ते पाच जणांनी जीप अडवली. त्यावेळी काहीजणांनी शुभम बाकले याच्यासह इतरांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जीपवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. याबाबत शुभम बाकले याने दिलेल्या फिर्यादीनुसार कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस. आर. पवार तपास करीत आहेत.