सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी आरडाओरड करत गोंधळ घालणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, बसस्थानक बाहेर आरडाओरड करत गोंधळ घालत असलेल्या तरूणांना हटकल्याने एका तरूणाने सातारा शहर पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या काखेत कोयत्याने वार केल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात हवालदार जखमी झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर त्यांना नऊ टाके घालण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चाैकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानका बाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरूण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याची माहिती त्यांना प्रवाशांनी दिली. त्यानंतर हवालदार पवार बसस्थानकाबाहेर आले. त्या ठिकाणी गेल्यानंतर पवार यांनी दंगा घालणाऱ्या तरूणांना त्यांनी हटककेले. त्यानंतर तेथून तरूण निघून गेले. हवालदार दत्ता पवार हे पुन्हा दंगा होऊ नये म्हणून काही वेळ बसस्थानकाबाहेरच उभे होते.
सुमारे पंधरा मिनिटानंतर मोपेड दुचाकीवरून चाैघेजण त्या ठिकाणी आले. दत्ता पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी शेवटी बसलेल्या तरूणाने त्यांच्या काखेत कोयत्याने वार केला. यानंतर संबंधित तरूण मोपेडवरून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेतही दत्ता पवार यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु संबंधित तरूण सापडले नाहीत.
या प्रकाराची माहिती समजल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर जखमी झालेल्या हवालदार पवार यांना तत्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, नऊ टाके घालण्यात आले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी करून झोपडपट्टीत शोध मोहीम राबविली. त्यावेळी तीन युवक पोलिसांच्या हाती लागले. तिघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.