सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे शिल्प उभे करावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अफजलखान वधाच्या जागेसमोर अफजलखान वधाचे शिल्प उभा करण्याचे काम मुंबईतील जे. जे. आर्टस ऑफ कॉलेजला देण्यात आले होते. हे काम ९० टक्के पूर्ण झाले असून या कामाची पाहणी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि इतिहास तज्ज्ञांच्या समितीकडून नुकतीच करण्यात आली. यावेळी तज्ज्ञांकडून शिल्पाच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना करण्यात आल्या. शिल्प बनून ते प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वधाच्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्यावतीने प्रतापगडावर श्रीशिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्यावतीने शिवप्रतापाचे शिल्प बनविण्याची मागणी केली होती. त्यानुसार जे. जे. आर्टस ऑफ कॉलेज, मुंबई यांच्याकडून पुतळा बनवण्यासाठी निविदाही मागविल्या. त्यानुसार काम सुरू होऊन अंतिम टप्प्यात आले आहे. या शिल्पाची पाहणी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे, मुंबईचे डीन प्रा. विश्वनाथ साबळे, इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, मुर्तीकार नितीन मेस्त्री, किशोर ठाकूर, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रा. डॉ. विजय सपकाळ, शशिकांत काकडे व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली.
यावेळी इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व अफजलखानाच्या लढाई दरम्यान असलेल्या वयाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वय वर्षे २९ व अफजलखानाचे वय वर्षे ५५ ते ६० च्या दरम्यान असल्याने त्या वयाप्रमाणे दोघांची चेहरेपट्टी असावी असे सूचित केले. तर मूर्तिकार
किशोर ठाकूर व नितीन मेस्त्री यांनी देखील शिल्पाच्या महत्वाच्या दृष्टीने काही सूचना केल्या. हिंदू एक आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनीदेखील कमिटीस देखील सूचना केल्या. यावेळी गजानन मोरे, चेतन भोसले, श्रीधर मेस्री उपस्थित होते.
पराक्रमाचे लवकर शिल्प उभारा; माजी आ. नितीन शिंदे
माजी आमदार नितीन शिंदे यांनी नुकतीच सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारने आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. अफजल खानाच्या कबरीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाचे शिल्प उभे करावे. तसेच अफजल खान वधाचा पराक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये कोरण्यात यावा, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे सांगितले.
एक वर्षापूर्वी अवैध बांधकामे जमीनदोस्त
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरातील अनाधिकृत बांधकामे पाडण्यासाठी शिवप्रेमी संघटनांनी आंदोलनं केली होती. कोर्टानेही अवैध बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण संवेदनशील असल्याने बरीच वर्षे कारवाई होऊ शकली नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी ती बांधकामे प्रचंड मोठ्या बंदोबस्तात जमीनदोस्त केली होती.
अत्यंत गुप्ततेत कारवाई
कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी प्रशासनाने ९ नोव्हेंबर २०२२ रोजी रोजी रात्रीपासूनच मोठी तयारी केली होती. चार जिल्ह्यातील 1600 पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला होता. हे पोलीस रात्रीच प्रतापगड परिसरात दाखल झाले होते. तसेच, अवजड यंत्रसामग्री प्रतापगडाकडे जात होती. महाबळेश्वरच्या बाजारपेठेत देखील पोलिसांची गस्त सुरू होती. त्यामुळे प्रशासनाकडून कसल्या तरी हालचाली सुरू असल्याची चाहूल स्थानिकांना लागली होती. मात्र, अत्यंत गोपनीयता बाळगत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० नोव्हेंबर रोजी पहाटे प्रशासनाने कबरीच्या परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती.
२५ वर्षांपूर्वी अनाधिकृत बांधकामे
अफजल खान कबरीच्या परिसरात २५ वर्षांपूर्वी अनाधिकृत बांधकामे सुरु झाल्याचं सांगितलं जातं होतं. अफझल खान मेमोरिअल ट्रस्ट स्थापन करुन काही अपप्रवृत्तींनी ही बांधकामे केल्याचा आरोपही झाला होता. वन विभागाच्या जागेत १९ खोल्या बांधण्यात आल्या होत्या. दरम्यान, गँगस्टर हाजी मस्तान, करीमलाला आणि युसुफ पटेल यांनी हे बांधकाम केल्याचा आरोप सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी केला होता. कबरीसाठी मुंबईहून मोगऱ्याचा हार यायचा, अशीही चर्चा होती.