तात्काळ आरक्षण द्या, नाहीतर तिरडी बांधू…; सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील महिलांचा सरकारला थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. कुठे नेत्यांना अडवून गावबंदी करीत कार्यक्रम घेण्यास बंदी घातली जात आहे तर कुठे जाळपोळ, दगडफेक केली जात आहे. या आंदोलनाचा वणवा सातारा जिल्ह्यात देखील पसरला आहे. नुकतेच दहिवडी येथे मराठा बांधवांनी एसटी फोडली आहे. तर काल सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात जवळवाडी येथे सकल मराठा समाजातील महिलांना आक्रमक पावित्रा घेत कॅन्डल मार्च रॅली काढली. तसेच तात्काळ आरक्षण द्या नाहीतर सरकारची तिरडी बांधू असा थेट इशाराच दिला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्याच्या उपोषणाचा आजचा अथवा दिवस आहे. अन्न-पाण्याचा त्याग करून ते लढा देत आहेत. ४० दिवस देवूनही सरकार अजूनही आरक्षण देत नसल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

मनोज जरांगे पाटील शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन करीत असून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळवाडी येथिल सकल मराठा समाजाचे वतीने श्री भैरवनाथ मंदिर जवळवाडी येथून रात्री ८ वाजता कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली. मेढा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक ते जवळवाडी अशी २ कि.मी.ची भव्य काढलेल्या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती खुप मोठ्या प्रमाणात होती.

यावेळी विविध घोषणा देत असताना महिलांनी सरकार बद्दलची चीड व्यक्त केली.आमची लेकरं अहोरात्र मेहनत घेवून गुणवत्ता मिळवितात पण आरक्षण नसल्याने हाती काहीच लागत नाही असा संताप व्यक्त करीत येत्या दोन दिवसात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण सरकारने दिले नाही तर मात्र सरकारची तिरडी बांधावी लागेल अशा संतप्त भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या आहेत.