सातारा प्रतिनिधी । शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने शनिवारी साजरा करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी गावच्या दरम्यान वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही तीरावर दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार केला.
यावेळी प्रथम बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत गेल्या. यंदा ओढ्याला पाणी असल्याने त्यांनी सुरुवातीला ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीच्या बाराची सुरवात केली. त्यानंतर दोन्ही बाजूकडील महिलांनी पाण्यात उतरत एकमेकींवर पाणी उडवत यंदाचा बार उत्साहात साजरा केला.
बोरीचा बार घालण्याची परंपरा कायम
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या गावातील महिला गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा राबवतात. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारानंतर दोन्ही गावांच्या मधील ओढ्यात येऊन शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्याची परंपरा पुढे चालवित असतात. बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात, त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करतात. श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढतो.
लोणंद पोलिसांचा मोठा बंदोबस्त
यावर्षी जोरदार झालेला पाऊस आणि धोम -बलकवडी कालव्यातून सोडलेल्या पाण्यामुळे बोरी व सुखेडमधून जाणारा ओढा खळखळ वाहत होता. त्यामुळे गुडघाभर पाण्यात बोरीचा बार कसा भरणार, याची उत्कंठा सर्वांना होती. लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलिस, महिला पोलिसांनी सकाळपासून तयारी केली होती. दुपारी बाराच्या सुमारास पहिल्यांदा सुखेड गावातील महिला डफडे, ताशा, शिंग आदी वाद्यांसह वाजत गाजत ओढ्याच्या तीरावर येऊन थांबल्या. काही वेळातच बोरी गावातील महिलांही वाजत गाजत दुसऱ्या तीरावर येताच दोन्ही बाजुच्या महिलांनी एकमेकांना हातवारे करीत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार घालण्यास सुरुवात केली.