सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागावर ‘दुष्काळी’ हा शिक्का कायमच बसला असून, या भागात सध्या 50 रुपये प्रतिबॅरल या दराने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या परिस्थितीत देऊर ग्रामपंचायतीने तळहिरा पाझर तलावातील विहिरीचे 2016 पासून रखडलेले काम पूर्ण करून, गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे देऊरकरांची तहान भागवण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम, सरपंच शामराव कदम, माजी उपसरपंच ज्ञानदेव कदम, सुनील चव्हाण, उमेश देशमुख, सुरेश जाधव, अॅड. प्रसाद सुतार, ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी चव्हाण, लतिका लांडगे, प्रकाश देशमुख व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जलपूजन आणि ओटीभरण करण्यात आले.
राहुल कदम म्हणाले, देऊर गावासाठी शाश्वत पाणीपुरवठा योजना असावी, यासाठी 2014 पासून प्रयत्न झाले. तळहिरा तलावात विहीर खोदून, गावाला पाणीपुरवठा व्हावा, असा सूर ग्रामस्थांमधून व्यक्त झाल्याने, पाणी योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला. यासाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सहकार्य केले.