सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सातारा शहरातील कृष्णानगर मध्ये भव्य आणि दिव्य ‘सिंचन भवन’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीसाठी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे या प्रकल्पाची वाट मोकळी झाली आहे. नव्याने उभारण्यात येणारे ‘सिंचन भवन’ पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या व्यवस्थापनाचे प्रमुख केंद्र असेल. या भवनातून सर्व सिंचन प्रकल्पांचे एकाच छताखाली नियोजन, देखरेख व नियंत्रण केले जाणार आहे. त्यामुळे सिंचनाच्या प्रलंबित कामांचा वेगाने निपटारा होईल आणि शेतकर्यांना अधिक जलसंपन्नता मिळणार आहे.
सातार्यातील हे सिंचन भवन आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर उभारले जाणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाचे कामकाज जलद गतीने करण्याची गरज व्यक्त केली. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाच्या समस्यांवर अधिकाधिक लक्ष देऊन त्या मार्गी लावण्यासाठी या ‘सिंचन भवन’ प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.