सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील एक जागतिक वारसास्थळ असलेल्या आणि पुष्प सौंदर्याने सर्वांना भुरळ घालणारे कास पुष्प पठार उन्हाच्या झळांनी चांगलेच भाजून निघत आहे. या तलावाचा मुकुटमणी असलेल्या कुमुदिनी तलावाने तळ गाठला असून लवकरच हा तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची ओळख आहे. या कास पठारापासून राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील फुलांच्या हंगामात हजारो पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी देणाऱ्या कुमुदिनी तलावातील पाणी आटू लागले आहे. हा तलाव पूर्णतः कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे. कास पठारावरील कुमुदिनी तलाव राजमार्गावर असून अडीच हेक्टर परिसरात तलाव पसरलेला आहे.
तलावात कुमुदिनीची पांढरी कमळे फुलतात म्हणून याला कुमुदिनी तलाव म्हणून ओळखले जाते. पुष्प हंगामात ऐन बहरात हा तलाव पांढऱ्या शुभ्र कुमुदिनीच्या फुलांनी बहरून जातो. त्यावेळी त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. अत्यंत दुर्मीळ असणारी ही फुले फक्त याच तलावात आढळतात. त्यामुळे या तलावाला विशेष महत्त्व आहे. कासची बहु विविध असणारी – जैवविविधता जपण्याचे काम या तलावामुळे शक्य होते. संपूर्ण पठारावरील प्राणी, पशुपक्षी, छोटेमोठे – कीटक या सर्वांना पाणी पुरवण्याचे काम हा तलाव करत असतो. एवढा मोठा पाणीसाठा असणारा तलाव कास पठारावर नाही. त्यामुळे पठारावरील वन्य प्राण्यांचे आश्रयस्थान हा तलाव परिसर कायमच असतो.