सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्यात विहित मंजूर पाणी सुरू आहे. ते संपताच आज बंद करण्यात येणार आहे. तसेच लाभक्षेत्रात चालू आवर्तन आणि उन्हाळी आवर्तनासाठी धोम जलाशयातून सात टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
वाई तालुक्यातील धोम धरणातील बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटणला पाणी सोडण्यात येत होते, ते त्वरित थांबवावे व धोम धरण लाभक्षेत्रातील शेतीला हक्काचे मंजूर पाणी वेळेत मिळावे, या मागणीसाठी मागील महिन्यात ३० जानेवारी रोजी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीसह शेतकऱ्यांनी कोरेगाव तहसीलदार कचेरीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषण सोडतेवेळी सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन समितीच्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती.
त्यानुसार काल सातारा येथे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच सिंचन प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा झाली. त्यात सर्वांनी सकारात्मक चर्चा करत धोम धरणातून बलकवडी बोगद्यातून खंडाळा व फलटण तालुक्यात सुरू असलेले विहित मंजूर पाणी समाप्त होताच ते आजपासून बंद करण्यात येईल. यानंतर कोणत्याही कारणास्तव बलकवडी कालव्यातून पाणी सोडले जाणार नाही, अशी हमी देण्यात आली.