कास धरणातील पाणी पावसामुळे झाले गढूळ; पालिकेने केलं महत्वाचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणातील पाणी पावसामुळे गढूळ झाले असून, काही पेठांमध्ये माती मिश्रित पाणी येऊ लागले आहे. नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अजून मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. मात्र, जावळी, महाबळेश्वर व कोयना खोऱ्यात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. अर्धा टीमएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या कास धरण परिसरातही गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आल्याने धरणातील पाणी गढूळ झाले आहे.

त्यामुळे शहरातील मंगळवार पेठ, रामाचा गोट, चिमनपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, यादोगापाळ पेठेचा काही भाग, डोंगर भागातील माची पेठ तसेच भैरोबा टाकीवरुन पाणीपुरवठा होणाऱ्या भागात गढूळ व मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कास उद्भव योजनेतून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या भागातील नागरिकांनी पावसाळा संपेपर्यंत पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.