कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण मतदार संघात यंदा २०२४ च्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराजबाबा चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले. आता या मतदार संघात प्रत्यक्ष मतदान पार पडले असून कराड दक्षिणमध्ये ७६.३२ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस मतांचा टक्का वाढला असून हा मतांचा वाढलेला टक्का दोन्ही बाबांपैकी कुणा एका ‘बाबा’ला धक्का देणार? याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांसमोर भाजपानं मोठं आव्हान उभं केल्याने इथल्या निकालाकडे जिल्ह्याबरोबरच राज्यातील राजकीय जाणकारांचंही विशेष लक्ष आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी प्रचाराचा चांगलाच धुरळा उडविलयाचे पहायला मिळाले. उंडाळकर गटाशी एकी झाल्याने पृथ्वीबाबांचे हात बळकट झाले. मात्र, डॉ. अतुल भोसले यांनीही ताकद पणाला लावली हे नाकारता येत नाही. भाजपकडून उमेदवारी घेत डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण मतदार संघातील प्रत्येक गांव पिंजून काढले. एकंदरीत या निवडणुकीत एका बाबांनी केलेली विकास कामे जनतेसमोर मांडली तर दुसऱ्या बाबांनी विकासकामांसाठी मंजूर करून आणलेला निधीचा लेखाजोखा सादर केला. आता कराड दक्षिणमधील जनतेने मतदान केलं आहे. यंदा दोन्हीपैकी एका बाबाच्या अंगावर गुलाल पडणार आहे. मात्र, ही निवडणुक दोन्ही बाबांच्यासाठी चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे.
कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात १ हजार ८०० कोटींचा निधी मतदार संघांसाठी दिला. तर कोणतेच पद नसतानाही डॉ. अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपश्रेष्ठींचा विश्वास जिंकत दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. दोन्ही बाबांनी कराड दक्षिण मतदार संघांचा आपण चेहरा मोहरा बदलून टाकू असे सांगितले जरी असले तरी मतदार राजाचा कौल हा शेवटी मतमोजणीनंतरच कोणत्या बाबाकडे गेलाय हे समजणार आहे.
सोशल मीडियात दोन्ही बाबांच्या विजयाची चर्चा
काल मतदान पार पडल्यानंतर आज सोशल मीडियात कराड दक्षिणेतील उमेदवार पृथ्वीराजबाबा चव्हाण आणि डॉ. अतुलबाबा भोसले या दोन्ही बाबांच्या विजयाची चर्चा होऊ लागली आहे. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या एका कार्यकर्त्याने तर त्यांच्या नावाची आमदार डॉ. अतुलबाबा भोसले नावाची पाटीच तयार केली असल्याचा फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल केला आहे. तर काहीही झालं तर यंदा पृथ्वीराजबाबा चव्हाण हॅटट्रिक मरणारच असे काही कार्यकर्ते सांगत आहेत.
२ लाख ४० हजार ७४३ मतदारांनी बजावलाय मतदानाचा हक्क
कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी काल प्रत्यक्ष मतदान पार पडले. या मतदार संघात एकूण ३ लाख १५ हजार ४२० इतकी मतदार संख्या आहे. यापैकी २ लाख ४० हजार ७४३ इतके मतदान पार पडले आहे. यामध्ये १ लाख २३ हजार ८९६ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून १ लाख १६ हजार ८३५ स्त्रीयांचे मतदान झाले आहे. तर १२ तृतीय पंथीयांनी मतदान केले आहे.
2019 मध्ये 9130 मतांच्या फरकाने पृथ्वीराज बाबांनी मिळवला विजय
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चव्हाण पृथ्वीराज दाजी साहेब यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) चे डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांना 9130 मतांच्या फरकाने हरवून या सीटवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना ९२ हजार २९६ इतकी मात्र पडली होती तर डॉ. अतुल भोसले यांना ८३ हजार १६६ एवढी मते पडली होती.
फडणवीस, शहा आणि गोव्याचे मुख्यमंत्री, वाघ यांच्या सभांचा करिष्मा दिसणार का?
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महायुतीकडून अधिकृत उमेवार म्हणून डॉ. अतुलबाबा भोसले निवडणूक रिंगणात उतरलेत. त्यांनी मतदार संघात अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा देखील घेतल्या आहेत. केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आमदार सौ. चित्रा वाघ यांनी कराड दक्षिण मतदार संघातील अनेक मतदार बांधवांशी संवाद साधला. त्यांच्या या सभा, बैठका यांचा करिष्मा मतदारराजावर किती उमटला आहे. हे प्रत्यक्ष मतमोजनीनंतर स्पष्ट होईल.
पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक करणार?
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवली. त्यामध्ये ते विजयी झाले. मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 मध्ये विलासकाका उंडाळकर हे कराड दक्षिणमधून विजयी झाले होते. 2014 ला पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणाहून विजयी झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील पृथ्वीराज चव्हाण अतुल भोसले यांचा पराभव करुन पुन्हा एकदा आमदार बनले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण पुन्हा रिंगणात उभे राहिले असून त्यांच्यासमोर अतुल भोसलेंनी आव्हान उभे केले. या निवडणुकीत विजयी झाल्यास पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण मतदारसंघातून हॅटट्रिक करु शकतात. मात्र, त्यांची हॅटट्रिक होणार का? हे २३ रोजीच्या निकालानंतर कळणार आहे.
कराड दक्षिणेतला हनुमान अन् मतदारराजा कोणत्या ‘बाबा’ला पावणार?
राजकीय पटलावर प्रचारामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते. मात्र, काही परंपराही राजकारण्यांकडून पाळल्या जातात. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी सर्वात महत्वाच्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला. भाजप महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी निवडणुक लढवली. दोघांनीही कराड दक्षिणेतील विंगच्या हनुमानाला नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली. आता विंगचा हनुमान आणि मतदार राजा कोणत्या बाबाला पावणार? हे पहावे लागणार आहे.