सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 11 व तामीळनाडूमधील जिंजीच्या किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ यादीत समावेश करावा, असा प्रस्ताक युनेस्कोला पाठवला आहे. या यादीत सातारा जिह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे. दरम्यान, किल्ले प्रतापगडाला शुक्रवारी (दि. ४) ‘युनेस्को’चे पथक भेट देणार असून या पथकाकडून गडावरील स्वच्छता व्यवस्थापन, किल्ल्यावरील मुख्य दरवाजा, चोर वाटा आदींची पाहणी केली जाणार आहे.
युनेस्कोचे पथक आता पुणे येथे दाखल झाले असून, शुक्रवारी ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. युनेस्कोने वारसा स्थळांच्या यादीत प्रतापगडाचा समावेश केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची जगाला नव्याने ओळख होईल. तसेच युनेस्को शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ले संवर्धनासाठी मदत करू शकेल. किल्ले प्रतापगडाची पाहणी झाल्यानंतर युनेस्कोची टीम साताऱ्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देणार आहे. येथील बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतीची हे पथक पाहणी करणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याचा लवकरच जागतिक वारसास्थळांत समावेश होणार आहे. युनेस्कोचे पथक प्रतापगडाची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे. दि. 3 रोजी हे पथक जिह्यात दाखल होईल आणि यात विविध देशांतील तज्ञ अधिकाऱ्यांची टीम, राज्य व जिल्हा समितीतीळ सदस्य आदींचा समावेश असणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली नुकतीच बैठक
किल्ले प्रतापगड येथे 4 ऑक्टोबरला युनेस्कोचे पथक भेट देऊन पाहणी करणार असल्याने या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक पार पडली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित विभागांना तशा सूचना दिल्या आहेत.
प्रतापगडावर झेडपीच्या कर्मचाऱ्यांकडून महाश्रमदान
प्रतापगडाच्या पाहणीसाठी हे पथक लवकरच येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, गाईड, पंचक्रोशीतील बचत गटाच्या महिला, पंचायत समितीचे कर्मचारी, शिक्षक, अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी केलेल्या श्रमदानातून पाच किमीचा तटबंदी लगतचा मार्ग स्वच्छ करण्यात आला.