सातारा प्रतिनिधी । जगात प्रामाणिक लोक फार कमी बघायला मिळतात. अशा लोकांची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्याच्या कृतीतून एखादा अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी प्रामाणिक असल्याची ओळख होते. अशाच एका प्रामाणिकपणाची घटना नुकतीच सातारा जिल्ह्यात घडली. ट्रॅफिक हवालदाराच्या तत्परतेणे आणि हॉटेल कर्मचारी यांच्या प्रामाणिकपणामुळे हॉटेलमध्ये विसरलेले जवळपास 60 हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे असणारी बँग फक्त १ तासात परत मिळाली. पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा व हॉटेल कर्मचारी यांच्या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे.
घडलं असं की, सातारा येथील राहिवाशी व स्नेहा सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख गणेश वाईकर हे खंडाळा येथे आपल्या ऑफिस कामासाठी निघाले होते. आनेवाडी टोल नाका येथे असलेल्या सोनावणे फूड मॉलमध्ये ते हॉटेल एकदंतमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा पिऊन ते खंडाळा येथे आपल्या कामासाठी निघून गेले. मात्र, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपली महत्वाची कागदपत्रे व रक्कम असलेली बॅग आपल्याकडे नाही मग त्यांनी येथील टोल नाक्यावर असणारे भुईंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी ट्रॅफिक हवालदार सुशांत धुमाळ यांना कॉल करून माहिती दिली.
तेव्हा धुमाळ व त्यांचे सहकारी गोकुळ बोरसे, मंदार शिंदे यांनी त्या हॉटेलमध्ये चौकशी केली असता येथील कर्मचारी दत्तात्रय चव्हाण यांनी ती बॅग व्यवस्थित ठेवली असल्याचे सांगितले. बॅग तपासली असता त्यामध्ये गणेश वाईकर यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यामधील सर्व वस्तू कागदपत्रे व रोख रक्कम 60 हजार जशीच्या तशीच होती. गणेश वाईकर यांना कॉल करून लगेच त्याठिकाणी बोलवून घेतले. यावेळी येथील सोनावणे फूड मॉलचे राजेंद्र सोनावणे, बापू वाघ, हॉटेल मालक विजय पोपळे, प्रथमेश कदम यांच्या उपस्थितीत बॅग सर्व साहित्यसह गणेश वाईकर यांच्या सुपूर्त केली.
आज समाजात शा अनेक घटना घडतात मात्र, कर्तव्यदक्ष सुशांत धुमाळ यांच्यासारखे पोलीस कर्मचारी तसेच कष्ट करून आपला उदरनिर्वाह चालविणारे म्हस्वे गावचे दत्तात्रय चव्हाण यांच्यासारखे प्रामाणिक लोक समाजात असल्यामुळे माणुसकी टिकून आहे, आशा लोकांच्यामुळे प्रामाणिकपणा आजही टिकून आहे, आपले कर्मचारी सुशांत धुमाळ यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधिकारी सातारा अंचल दलाल, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, व भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी कौतुक केले.
योग्य पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांनाही न्याय
सपोनी रमेश गर्जे यांनी जेव्हापासून भुईंज पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतलयापासून आपले कर्मचारीदेखील कोणत्याही ठिकाणी आपले काम कर्तव्य दक्षपणे पार पाडत आहेत. कोणताही गुन्हा असो वा कोणतेही भावनिक मुद्दा असला तरी त्याठिकाणी योग्य पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांनाही न्याय मिळत आहे. रमेश गर्जे व त्यांचे सर्व सहकारी शिलेदार यांचे यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.