सातारा प्रतिनिधी | भरधाव गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कारने रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलच्या भिंतीला धडक दिली. सातारा-कास मार्गावर गुरुवारी दुपारी हा थरारक अपघात झाला.
या घटनेच्या वेळी समोरून एक दुचाकीस्वार येत होता. त्याच्या गाडीवर पत्नी आणि मुले होती. सुदैवाने कार रस्त्यातून बाजूला जाऊन हॉटेलच्या संरक्षक भिंतीला धडकली. अन्यथा भीषण अपघात घडला असता. या थरारक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहताना काळजाचा ठोका चुकत आहे.
अपघातग्रस्त गाडी आशा भवन मतिमंद शाळेची होती. मात्र, कारमध्ये विद्यार्थी नव्हते. गाडीत फक्त चालक होता. सीटबेल्ट लावला असल्यामुळे तो देखील या अपघातातून बचावला आहे.




