सातारा प्रतिनिधी | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोघांना अन्य तिघांनी दारूला पैसे दिले नाही म्हणून मारहाण व शिवीगाळ केली, तसेच त्यांच्याकडील पैसे व मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रकार लोणंद बसस्थानक परिसरात घडला. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की लोणंद बसस्थानक येथे विशाल कुदळे, ओमकार क्षीरसागर हे त्यांचा मित्र अतुल कुंभार- राजे याच्या वाढदिवसासाठी गेले असता तेथे अगोदरच उपस्थित असणाऱ्या सुयोग खताळ, बाळू खताळ, सोनू घुले (सर्व रा. कापडगाव, ता. फलटण) यापैकी सुयोग खताळ याने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चिडून जाऊन विशाल कुदळे यास शिवीगाळ, दमदाटी करून त्याचा मोबाईल व नऊ हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली.
बाळू खताळ याने विशालच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. सोनू खताळने विशाल व ओमकारला हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिघेही त्यांनी आणलेल्या कारमधून निघून गेले. विशाल कुदळे यांनी लोणंद पोलिस ठाण्यात या तिघांविरुद्ध तशी फिर्याद नोंदवली आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार डी. आर. पाडवी अधिक तपास करत आहेत.