सातारा ZP नोकर भरती परीक्षेचा तिसरा टप्पा ‘या’ तारखेपासून होणार सुरु; 5 संवर्गासाठी परीक्षा होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषद भरतीचा तिसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. संबंधित भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा हा दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागांतील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहेत. सातारा जिल्ह्यातही ३ केंद्रांवर या परीक्षा होत असून दि. १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरू केली आहे. परीक्षेच्या माध्यमातून हजारो पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतीलही रिक्त १९७२ कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. यासाठी दि. ७ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात लेखा वरिष्ठ सहायक, दोरखंडवाला, कृषी आणि सांख्यिकी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, निम्न. श्रेणी आणि उच्च श्रेणी लघुलेखक, लेखा कनिष्ठ सहायक आदी पदांची परीक्षा झाली. त्यानंतर परीक्षेचा दुसरा टप्पाही पार पडला. आता तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात दि. १ नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी आणि कनिष्ठ आरेखक या पदांसाठी परीक्षा होणार आहेत. तर दि. २ नोव्हेंबरला शिक्षण विस्तार अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी परीक्षा होत आहेत. सातारा जिल्ह्यात यासाठी सातारा शहरात दोन आणि कन्हाडला एक परीक्षा केंद्र आहे. तसेच या परीक्षेसाठी राज्यातील कोणताही उमेदवार पसंदी दिलेल्या जिल्ह्यात जाऊन तेथील केंद्रावर जिल्हा परिषदेच्या पदासाठी भरती परीक्षा देऊ शकतो.