सातारा प्रतिनिधी | शिवजयंतीचे औचित्य साधून पुण्यात दरवर्षी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित स्वराज्यरथ उत्सवात पहिल्यांदाच सहभागी झालेला अंजिक्यतारावीर किल्लेदार मानाजीराव साबळे यांचा रथ आकर्षणाचा केंद्र ठरला. यावेळी छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांनी स्वराज्य रथाचे उद्घाटन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडात सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे मानाजीराव साबळे किल्लेदार होते. बादशहा औरंगजेब याचा थोरला मुलगा शहजादा आजम याने अजिंक्यतारा किल्ल्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा किल्लेदार मानाजीराव साबळे यांनी ताकदीने मुकाबला करून किल्ला वाचविण्यासाठी शर्थीचा लढा दिला होता. मात्र, शत्रूच्या ताकदीपुढे मानाजीराव यांना या लढाईत वीरमरण प्राप्त झाले होते. मानाजीराव यांच्या शौर्याबद्दल शिवरायांनी त्यांच्या वारसांचा जिजाऊ आईसाहेब यांच्या हस्ते ताम्रपट व जहागीर देऊन सन्मान केला होता.
अशा मानाजीराव साबळे यांच्या वंशजांच्या वतीने प्रथमच शिवजयंतीचे औचित्य साधून स्वराज्यरथ काढण्यात आला होता. विशेष म्हणजे शिवरायांचे वंशज छत्रपती खा. उदयनराजे भोसले हे स्वराज्यरथाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले व त्यांनी साबळे कुटुंबीयांचा गौरव केला. या रथ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील हजारो साबळे कुटुंबीय परिवारासह सहभागी झाले होते.