सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारकडून सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अपात्र ठरवता त्या बंद करण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. यामधे 0 ते 20 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 10 व 20 पटसंख्याहून कमी असणाऱ्या शाळा आणि शिक्षकांची माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. राज्य शासनाने येत्या काळात कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास जिल्ह्यातील 624 शाळांवर गंडांतर येणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे
राज्यात 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद करण्याच्या घाट राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी राज्यातील 0 ते 20 शाळा किती आहेत? त्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक विभागाकडून मागवली होती. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होण्याचे संकेत मिळत आहेत.
20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर्गम भागातील विद्यार्थी दूर जातील. शिवाय शाळाबाह्य मुलांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ पटसंख्या कमी म्हणून हा निष्कर्ष गृहीत धरून शाळा बंद करणे हा विद्यार्थ्यांना अन्याय ठरणारा असल्याचे मत पालक, शिक्षक वर्गातून येत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 3025 शाळा
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 3 हजार 25 शाळा आहेत. त्यातील 611 शाळांमध्ये 20 हून कमी पटसंख्या आहे. याचबरोबर खासगी अनुदानित एक शाळा आहे. बारा शाळा स्वयंअर्थतत्त्वावर चालणाऱ्या आहेत. अशा 20 पटसंख्याहून कमी असणाऱ्या जिल्ह्यात एकूण 624 शाळा आहेत. याचबरोबर पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांत कार्यरत शिक्षकांचीही माहिती मागवली आहे. जिल्ह्यात सर्व विद्यार्थी, शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेने एकत्रित केली आहे. आठवड्याभरात ती पाठविण्यात येणार आहे.