पहाटेच्यावेळी सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर धडक कारवाई; दारूसह ट्रक, चारचाकीसह 3 जण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पहाटेच्यावेळी छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज धाड टाकत कारवाई केली. कराडजवळ नारायणवाडी गावच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत एक ट्रक, एक चारचाकी आणि 4 मोबाईल असा सुमारे 82 लाख 6 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुक्ल कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर संबंधित विभागाने कराड जवळ रत्नागिरीहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच- 50-एन- 7337) ला अडवले. ट्रक चालकासह तीघांना ताब्यात घेत ट्रकची तपासणी केली.

त्यामध्ये गोवा बनावट विदेशी दारु 180 मि.ली. क्षमतेच्या एकूण 11, 088 सिलबंद बाटल्या, 750 मि.ली 948 सिलबंद बाटल्या, बिअरचे 500 मि.लीचे 2400 कॅन तसेच एक चौदा चाकी मालवाहू ट्रक, पायलटींग करिता वापरलेले एक चारचाकी वाहन, गुन्ह्यातील अवैद्य मद्यसाठा लपविण्या करिता वापलेल्या भुश्याच्या 45 गोण्या, 4 मोबाईल संच असा एकुण 82 लाख 5 हजार 880 रूपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. तो मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तसेच रामजी चंद्रकांत होनमाने आणि मुस्ताक मुबारक नदाफ (दोघेही रा. जयभवानीगर, आटपाडी ता. आटपाडी जि. सांगली) यांच्यासह अन्य एकजण या तिघांवर गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्तसो डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क सातारा अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय साळवे, दुय्यम निरीक्षक शरद नरळे, सहा. दु. निरीक्षक नितीन जाधव, महेश मोहिते, सचिन खाडे, अजित रसाळ, भिमराव माळी, सचिन जाधव, श्रीमती मुनिजा मुल्ला यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संजय साळवे हे करीत आहेत.