सातारा प्रतिनिधी । फलटण परिसरात अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो (रंगदोष असलेला) साप लोकवसाहतीमध्ये आढळून आला. यावेळी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे प्रतिनिधी व वन्यजीव रक्षक पंकज पखाले यांनी घटनास्थळी पोहचून पाहिले असता तो भारतीय चष्मेवाला नाग (इंडियन स्पेकटॅकल्ड कोब्रा) जातीचा अल्बिनो साप असल्याचे समजले व त्याचा रंग पूर्ण गुलाबी-पांढरट असा दिसून आला. या सापाला लोकवसाहतीतून सुरक्षितरित्या पकडून त्याची संस्थेत नोंद करण्यात आली व त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
अल्बेिनिझम ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहे, जी उत्परिवर्तन किंवा बदलांमुळे उद्भवते, जी शरीरात तयार होणाऱ्या मेलेनिनच्या प्रमाणात प्रभावित करते. मेलेनिन सापांमधे त्वचा, डोळ्यांचे रंगद्रव्य (रंग) नियंत्रित करते. अल्बिनिझम असलेल्या सापांची त्वचा व डोळे अत्यंत फिकट गुलाबी पांढरट असते. हा एक असा अनुवांशिक विकार आहे, जिथे कोणत्याही सजीवाचा जन्म नेहमीपेक्षा कमी मेलेनिन रंगद्रव्यासह होतो.
भारतात अनेक प्रकारचे साप आढळतात. काही साप अत्यंत विषारी असतात. सर्पदंशामुळे अनेक लोकांचा मृत्यूही होतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भारतात आढळणारे काही साप अत्यंत विषारी असतात. त्यापैकी सर्वात धोकादायक आणि अतिविषारी जात म्हणजे इंडियन कोब्रा किंवा स्पेक्टेकल्ड कोब्रा. त्याच्या फण्यावरील चष्म्याच्या आकाराच्या चिन्हावरून तो ओळखला जातो. देशाच्या काही भागात त्याची नाग म्हणून पूजा केली जाते.
कोब्राची वैशिष्ट्ये :
विष : कोब्रा सापामध्ये सायनाप्टिक न्यूरोटॉक्सिन आणि कार्डिओटॉक्सिन नावाचे विष असते, ज्याचा मज्जासंस्था आणि हृदयावर खोल परिणाम होतो.
विषाचा प्रभाव : जगातील जहाल विषारी साप म्हणून ओळखले जाणारे क्रेट आणि रसेल वाइपरसारखा नाग आक्रमक किंवा विषारी नसतो तरीही कोब्रा किंवा नागामुळेच भारतात सर्वात जास्त मृत्यू झालेले दिसतात. कारण हा साप भारतात मुबलक प्रमाणात आढळतो.
लांबी : प्रौढ नागाची लांबी 1 ते 1.5 मीटर पर्यंत असू शकते.
शिकार : हा साप अनेकदा उंदरांची शिकार करतो, म्हणून तो लोकवस्ती, शेतात आणि शहरी भागात जास्त दिसतो.