भर चौकातून सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांना शिरवळ पोलिसांनी दणका दिला आहे. या ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्या २० जणांची पोलिसांनी शिरवळमधून धिंड काढली आहे. शिरवळ पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द उघडलेल्या धडक कारवाईचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन पंधरा वर्षीय युवतीच्या आत्महत्येच्या प्रकारानंतर शिरवळ पोलिसांनी व फलटण उपविभागाअंतर्गत असणाऱ्या निर्भया पथकाने छेडछाड करणाऱ्या टोळक्यांविरुद्ध तसेच अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले गेले आहे. यावेळी शिरवळ पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) हातभट्टी दारू विक्री करणारे, मटका व्यावसायिक व सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये संबंधितांची असणारी दहशत मोडीत काढण्याकरिता व नागरिकांत भीतीमुक्त वातावरणनिर्मितीकरिता शिरवळच्या पोलिस पथकाने अवैध धंदे करणाऱ्यांची शिरवळ व परिसरातून मुख्यतः शिरवळ पोलिस स्टेशन परिसर, एस.टी. बसस्थानक परिसर, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शासकीय विश्रामगृह, चावडी चौक, बाजारपेठ, रामेश्वर परिसर अशा मार्गावरून धिंड काढली.