सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना उद्यापासून सुरुवात होत आहे. काही शाळांच्या वेळा सकाळच्या असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठावे लागत आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेत तसेच सकाळी लवकर शाळा असल्यामुळे झोप होत नसल्याने शाळेची वेळा बदलण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा त्यानंतर भरवावेत असे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळा सकाळी 9 नंतर भरविण्यात याव्यात अशा सुचनाचे पत्रक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सातारा जिल्ह्यातील २ हजार ६८२ शाळांना पाठविण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची सुरुवात उद्या शनिवारी दि. १५ रोजी होत असून जिल्ह्यातील शाळांचा प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक होऊन शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी जिल्हा परिषदेच्या २६८२ शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत.
दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी राजभवन येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेच्या वेळेबाबत राज्यपाल रमेश बैस यांनी महत्वाच्या सूचना या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाच्या वतीने राज्यातील विविध शाळांच्या वेळा बदलण्याविषयी विविध शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक तसेच प्रशासनातील विविध अधिकारी यांचे अभिप्राय मागवून घेतले. त्या अभिप्रायात सकाळी 9 नंतर शाळा घेण्याबाबत सकारात्मकता दर्शवण्यात आली. त्यानंतर शासना मार्फत परिपत्रक जारी करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व शाळांना सकाळच्या वेळेबाबत परिपत्रक दिलेय : शबनम मुजावर
सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळांना शिक्षण विभागामार्फत राज्यपालांनी दिलेल्या सूचनांनुसार वेळेबाबत परिपत्रक पाठविण्यात आले आहे. ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी गटशिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवाव्यात. यासाठी शाळेच्या व्यवस्थापनाने कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी सकाळी ९ नंतर वर्ग न भरवण्यासाठी सकारात्मकता दर्शवावी. तसे आढळून न आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यात शाळांची संख्या
- विद्यार्थी संख्या : ४ लाख १० हजार
- खासगी विनाअनुदानित शाळा : ३२
- अनुदानित शाळा : ६१४
- जिल्हा परिषद शाळा : २,६८२
- नगरपालिका शाळा : ५२
नेमक्या काय केल्या आहेत परिपत्रकात सूचना?
शासनामार्फत राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरण्याची वेळ सकाळी नऊ वाजण्याच्या अगोदर आहे. त्या शाळांनी नवीन येणारे शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी. शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाचा निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घेण्याच्या सूचनाही या परिपत्रकात केल्या आहेत.