कराड तालुक्यातील ‘या’ लूटमारीच्या गुन्ह्यात पोलिसांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव घाटात आठ दिवसांपूर्वी लुटमारीची घटना घडली होती. या लूटमारीच्या गुन्ह्याच्या तपासात उंब्रज आणि मसूर पोलीस चोरावर मोर ठरण्याच्या खटपटीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांची नावे आणि घटनेची माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पोलीसच संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत.

नेमकी काय आहे घटना?

आठ दिवसांपूर्वी शामगाव घाटात लूटमारीची घटना घडली आहे. संशयितांनी एका वाहनातील लाखो रूपयांचा (अंदाजे २२ लाख) गुटखा चोरून पलायन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना अटक केली. तसेच त्यांना पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीही मिळाली.

माहिती देण्यास टाळाटाळ

या गुन्ह्याची आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देण्यास वरिष्ठ पोलीस अधिकारी टाळाटाळ करत आहेत. अजून काही संशयितांना अटक करायची आहे. माहिती उघड केल्यास संशयित सावध होतील, असे कारण सांगण्यात येत आहे. परंतु, या गुन्ह्यातील काही संशयितांना वाचविण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.

तपास आणि कारवाईत मोठे गौडबंगाल

घाटात वाहन अडवून करण्यात आलेल्या लूटमारीच्या गुन्ह्याच्या तपासात आणि कारवाईत मोठे गौडबंगाल समोर येत आहे संशयितांकडून गुटखा जप्त केलाय का? केला असेल तर मुद्देमाल कुठे ठेवला आहे? या गुन्ह्यातील संशयितांनी यापूर्वीही लूटमार केली आहे का? वाहनातील गुटखा लूटून तो कोणाला विकला जाणार होता? यासंदर्भातील माहिती द्यायला पोलीस टाळाटाळ का करत आहेत?

पोलीसही कायद्याला ‘बधे’नात

कायदा गुन्हेगारांना गुडघे टेकायला लावतो, असे म्हटले आणि सांगितले जाते. परंतु, कायदा राबविणारेच कायद्याला फाट्यावर मारत असतील तर अन्याय झालेल्याला न्याय आणि गुन्हेगारांना शासन कसे होणार? पोलीसही कायद्याला ‘बधे’नात, असाच काहीसा प्रकार शामगाव घाटातील लूटमारीच्या गुन्ह्यात समोर येत आहे. पोलीस अधीक्षक आणि कराड उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकांनी या गुन्ह्याच्या तपासाची चौकशी करण्याची गरज आहे.